विक्रम काळेंनी बजावला मतदानाचा हक्क
लातूर, दि.३०- औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी आज (सोमवारी) शांततेत मतदान पार पडले. या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रम काळे यांनी लातूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. यासाठी महाविकास आघाडीकडून आमदार विक्रम काळे हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. संपूर्ण मराठवाड्यात त्यांना पोषक वातावरण आहे. पंधरा दिवसांच्या प्रचारानंतर आज (सोमवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. मराठवाड्यात शांततेत मतदान झाले. शाळांना दुपारनंतर सुट्टी दिल्यामुळे दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढला. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रम काळे यांनी लातूर शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील मतदान केंद्रावर सकाळीच जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. सर्वांना शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री संजय बनसोडे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी कुलगुरू मधुकर गायकवाड, कॉंगे्रसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, माजी नगराध्यक्ष ऍड. व्यंकट बेद्रे, राष्ट्रवादी कॉंगे्रसचे शहराध्यक्ष मकरंद सावे, कॉंगे्रसचे शहराध्यक्ष किरण जाधव, अशोक गोविंदपूकर, कॉंगे्रसचे अभय साळुंके, जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, राजा मणियार, संस्थाचालक संघटनेचे रामदास पवार, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ, नवनाथ आल्टे, बबन भोसले, डी. उमाकांत यांच्यासह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार विक्रम काळे यांनी सकाळच्यावेळी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदान केंद्रांना भेटी देण्यासाठी ते लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर गेले. त्याचप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवरही त्यांनी भेटी देवून शिक्षक मतदारांच्या भेटी घेऊन शांततेत मतदान करण्याचे आवाहन केले.


0 Comments