*हॉटेल चालकाची मुलगी झाली एमबीबीएस डॉक्टर; कष्टाला मिळाले यशाचे सुवर्णफळ*
*डॉ.नेहा चौहान यांचे लातूर जिल्ह्यात सर्वत्र कौतुक*
*औसा (प्रतिनिधी आसिफ पटेल)* : मेहनत, जिद्द आणि पालकांच्या त्यागाच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण औसा शहरात पाहायला मिळाले आहे. औसा शहरातील हॉटेल व्यवसाय करणारे मुन्ना सिंग चव्हाण यांनी दिवस-रात्र मेहनत करून आपल्या मुलीला एमबीबीएस डॉक्टर बनविण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे लातूर जिल्ह्यासह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुन्ना सिंग चव्हाण हे औसा शहरात साध्या परिस्थितीत हॉटेल व्यवसाय करतात. अनेक वर्षांपासून त्यांनी प्रामाणिकपणे व्यवसाय सांभाळत कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. आर्थिक परिस्थिती फारशी मजबूत नसतानाही त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात कधीही तडजोड केली नाही. मुलगी डॉक्टर व्हावी, समाजसेवा करावी आणि स्वतःच्या पायावर उभी राहावी, हे त्यांचे मोठे स्वप्न होते.
हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये दिवस-रात्र कष्ट केले. सकाळपासून उशिरापर्यंत ग्राहकांची सेवा करताना त्यांनी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, मुलीच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्यांनी मेहनतीची पराकाष्ठा केली. त्यांच्या पत्नीनेही घरची जबाबदारी सांभाळून मुलीच्या शिक्षणात मोलाची साथ दिली.
चव्हाण यांच्या मुलीनेही आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून अभ्यासात सातत्य राखले. कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने एमबीबीएसचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यामुळे आता ती डॉक्टर म्हणून समाजसेवा करण्यास सज्ज झाली आहे.
या यशामुळे चव्हाण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नातेवाईक, मित्रपरिवार तसेच लातूर जिल्ह्यातील व औसा शहरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. अनेकांनी ही घटना सर्वसामान्य कुटुंबांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
आजच्या काळात आर्थिक अडचणींमुळे अनेक पालक मुलांच्या शिक्षणाबाबत चिंतेत असतात. मात्र, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर सर्व अडथळे पार करता येतात, हे मुन्ना सिंग चव्हाण यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
हॉटेल व्यवसायातून संसार सांभाळत मुलीला डॉक्टर बनविणाऱ्या या कष्टकरी वडिलांचा संघर्ष आणि यशाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. औसा शहरासाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे.


0 Comments