एसटी तिकीट दरवाढ तात्काळ रद्द करा, अन्यथा महाराष्ट्र दिनी आंदोलन.
सामान्य नागरिकांवर आर्थिक ताण; स्वच्छतेच्या नावाखाली आकारण्यात येणाऱ्या शुल्कावरही आक्षेप
औसा (प्रतिनिधी) – (एमआयएम) औसा प्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना निवेदन देत एसटी महामंडळाकडून करण्यात आलेल्या तिकीट दरवाढीचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मागील काही दिवसांपासून एसटी बस तिकिटांवर सुमारे १० टक्के दरवाढ करण्यात आली असून, स्वच्छतेच्या नावाखाली अतिरिक्त २ टक्के शुल्क आकारले जात आहे. ही दरवाढ कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आल्याने सामान्य नागरिकांवर अन्याय होत असल्याचे एमआयएमचे म्हणणे आहे.
इनामदार यांनी पुढे सांगितले की, राज्यातील अनेक बसस्थानकांची स्वच्छता समाधानकारक नसताना अशा प्रकारचे शुल्क आकारणे चुकीचे आहे. अनेक ठिकाणी अस्वच्छता व पाण्याचे साचलेले डबके दिसून येतात, त्यामुळे स्वच्छतेच्या नावाखाली घेतला जाणारा अतिरिक्त भार नागरिकांना मान्य नाही.
एमआयएमने शासनाकडे मागणी केली आहे की, ही तिकीट दरवाढ तात्काळ रद्द करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा, येत्या १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने औसा बसस्थानकावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी निवेदन देताना शेख अलीम, शेख मुशीर, अझहर कुरेशी, शेख जैनुऊल्ला आदि उपस्थित होते.
या निवेदनाची प्रत स्थानिक पोलीस प्रशासनालाही माहितीस्तव देण्यात आली आहे.

0 Comments