सोलापुरातील जड वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करा - संभाजी ब्रिगेड.
सोलापूर ( प्रतिनिधी) जड वाहतुकीमुळे शहरातील अपघातांचे प्रमाण वाढून नाहक नागरिकांचा बळी जात आहे त्यामुळे जड वाहतूक नियमांची काटकरपणे अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सोलापूर शहरामध्ये जड वाहतुकीच्या अपघातामुळे दोन वर्षात तब्बल 159 निष्पाप लोकांचे जीव गेले आहेत. सोलापूर शहरात सकाळी सहा ते सायंकाळी नऊ पर्यंत जड वाहनास प्रवेश बंदी असताना सुद्धा सोलापूर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर सर्रासपणे अनेक जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे याकडे शहर पोलिस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. जड वाहनामुळे होणार्या अपघातांची मालिका अद्यापी सुरूच आहे यात सर्वसामान्य नागरिकांचा नाहक बळी जात आहे याला महानगरपालिका, पोलिस प्रशासन व आरटीओ अधिकारी आणि सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत असा आरोप संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आला आहे.
जड वाहतुकीमुळे अनेक नागरिकांचा बळी जाऊन सुद्धा लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. शहराच्या बाहेरून जड वाहतूक वळविण्यासाठी बाह्यवळण रस्ता किंवा रिंगरोड होणे आवश्यक असताना, त्यासाठी कोणत्याच लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केलेले दिसून येत नाही जड वाहतुकीबाबत शहर पोलिस आयुक्त यांनी काही नियम केलेले आहेत, परंतु या नियमांचे काटेकोर पालन होत नाही. शहरांमध्ये चिरीमिरी घेऊन जड वाहने सोडली जात असल्याचे अनेक वृत्तपत्रात आले आहे. शहरात फिटनेस प्रमाणपत्र नसलेली वाहने व ओव्हरलोड वाहतूक, याकडे आरटीओचे देखील दुर्लक्ष आहे. अशा वाहनावर सातत्याने कारवाई केली जात नाही. अत्यावश्यक सेवेचे नावाखाली इतर जड वाहने शहरामध्ये वाहतूक करताना दिसत आहेत. त्याकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर अपघात होत आहेत. अत्यावश्यक सेवेतील जड वाहनांना कमी वर्दळीचा रस्ता असलेल्या भागातून दुपारी एक ते तीन या वेळेत परवानगी देण्यात यावी. वाहतूक पोलिस हे वाहनधारकांकडून दंड वसुली करण्याच्या मोहिमेत गल्लीबोळात व्यस्त असतात. जड वाहतुकीकडे यांचे अजिबात लक्ष नसते. जड वाहतुकीमुळे मागील 4-5 वर्षांत एक हजाराहून अधिक अपघात झालेले आहेत. जवळपास सातशेहून अधिक नागरिकांना कायमचे अपंगत्व प्राप्त झाले आहे. यात सर्वाधिक शाळकरी मुले तसेच महाविद्यालयीन युवक- युवतीचा समावेश आहे.
सोलापूर शहरातील रस्ते अरुंद असून अनेक रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण केलेला रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला पाहिजे, त्यासाठी महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची गरज आहे.
जड वाहनांना वर्दळीच्या रस्त्यावर प्रवेश बंदी घालण्यात यावी. शहरातील रस्ते अगोदरच अरुंद असून त्यात जड वाहनांमुळे अपघात होत आहेत. त्यात निष्पक नागरिकांचे नाहक जीव गेलेला आहे. अशा घटना घडल्यावर माध्यमातून छापून आल्यावर चार-पाच दिवस कडक कारवाईचे नाटक केले जाते. परत परिस्थिती कायम असल्याचे दिसून येते. पादचारी लोकांना फुटपाथ मोकळे करून द्यावे. भविष्यात अशा कारणांमुळे कोणाचाही जीव जाणार नाही, याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी. तीन दिवसांपूर्वी अपघातात मरण पावलेला श्रीपाद कवडे यांच्या पालकांना प्रशासनाने योग्य ती मदत ताबडतोब करावी. यापुढे अपघात झाल्यास संभाजी ब्रिगेड च्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम उपाध्यक्ष सीताराम बाबर कार्याध्यक्ष अरविंद शेळके जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र माने संघटक बसवराज आलगे उपाध्यक्ष गजानन शिंदे सचिव रमेश चव्हाण भैरव माने ईत्यादी उपस्थित होते

0 Comments