१० पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीची अधिसूचना १६ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होणार असून ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होईल
राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी २०२६ रोजी लातूर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या लातूर, औसा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, उदगीर, जळकोट, निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी या १० पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीची अधिसूचना १६ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होणार असून ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होईल. तसेच ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक पथके स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी गणेश पवार, उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर यांच्यासह विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजेच १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत. मात्र, १८ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. या नामनिर्देशनपत्रांची छाननी २२ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. तसेच २३, २४ आणि २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. २७ जानेवारी रोजी दुपारी ३.३० नंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटपाची कार्यवाही केली जाईल. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे, तसेच ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० पासून मतमोजणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण ५९ जिल्हा परिषद गट आणि ११८ पंचायत समिती गण आहेत. अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण १४ लाख ९९ हजार १९० मतदार असून, यामध्ये ७ लाख ८६ हजार ६८३ पुरुष आणि ७ लाख १२ हजार ४९४ महिला मतदारांचा समावेश आहे.
जिल्ह्यात एकूण १ हजार ७५३ मतदान केंद्रे स्थापित केली जाणार असून यामध्ये १३ महिला संचलित, ११ युवा संचलित आणि ६ दिव्यांग संचलित मतदान केंद्रे असतील. सर्व केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, शेड आणि स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय असेल. या निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण १० हजार ५१८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. जिल्हा परिषद उमेदवारासाठी ६ लाख रुपये आणि पंचायत समिती उमेदवारासाठी ४.५ लाख रुपये खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथके व स्थिर संनियंत्रण पथके तैनात केली आहेत. सर्व मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी कायदा व सुव्यवस्थाविषयक तयारीच्या अनुषंगाने माहिती दिली.
याठिकाणी स्वीकारली जाणार जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक नामनिर्देशनपत्रे
१) अहमदपूर तालुका- तहसिलदार अहमदपूर यांचे दालन, तहसिल कार्यालय, अहमदपूर
२) जळकोट तालुका- मुख्याधिकारी यांचे दालन, प्रशासकीय इमारत, जळकोट
३) उदगीर तालुका- उपविभागीय अधिकारी उदगीर यांचे दालन, महसूल भवन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, उदगीर
४) देवणी तालुका- सभागृह, तहसील कार्यालय, देवणी
५) शिरूर अनंतपाळ- तहसीलदार यांचे कक्ष, तहसील कार्यालय, शिरूर अनंतपाळ
६) चाकूर तालुका- तहसील कार्यालय चाकूर येथील तहसीलदार चाकूर यांचे दालन
७) रेणापूर तालुका- तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय, रेणापूर
८) लातूर तालुका- तहसीलदार लातूर यांचे कोर्ट हॉल, तहसील कार्यालय, लातूर
९) औसा तालुका- कोर्ट हॉल, तहसील कार्यालय, औसा
१०) निलंगा तालुका- कार्यशाळा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बिदर रोड, निलंगा
****

0 Comments