स्वच्छता ठप्प, डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढला – तात्काळ उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा

 औसा शहरात घाणीचे साम्राज्य; एमआयएम प्रमुख सय्यद मुजफ्फर अलि इनामदार कडून नगर परिषदेला इशारा


स्वच्छता ठप्प, डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढला – तात्काळ उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा





औसा (जि. लातूर):

औसा शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नाल्या तुडुंब भरल्या आहेत, कचरा उचल बंद आहे तसेच मागील काही दिवसांपासून घंटागाडी व झाडू मारण्याचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढल्याचा आरोप एमआयएम कडून करण्यात आला आहे.


या संदर्भात एमआयएम औसा  प्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देत तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नगर परिषदेत सफाई कर्मचारी असतानाही प्रत्यक्षात शहरात साफसफाई होत नाही. तोंडी चौकशी केली असता रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्याने ते कामावर हजर नसल्याचे समोर आले आहे.



शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत भाग, नाल्या व सार्वजनिक ठिकाणे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. लहान मुले, वृद्ध व महिला यांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचेही एमआयएम   प्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांच्या कडून सांगण्यात आले.


एमआयएम च्या वतीने नगर परिषदेला इशारा देण्यात आला असून, तात्काळ कायमस्वरूपी सफाई कामगारांकडून संपूर्ण शहरात स्वच्छता करून घ्यावी, नाल्यांची सफाई करावी व बंद असलेले पथदिवे तातडीने बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.


जर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर नगर परिषदेच्या समोर कचरा फेको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांना  देण्यात आला आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी एमआयएम  कडून करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments