औसा येथील ईदगाह रस्त्यावर अतिक्रमण; एम आई एम ची प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी
औसा : शहरातील ईदगाहकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून व रस्ता अडवून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांना विशेषतः रमजान काळात नमाजासाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईदगाह मार्गावरील एका हॉस्पिटलच्या बांधकाम ठेकेदाराने रस्त्यावरच वाळू, मुरूम व सिमेंटचे साहित्य टाकले आहे. तसेच पाईपलाईन व पाण्याचा साचलेला चिखल यामुळे रस्ता पूर्णपणे खराब झाला असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे पादचारी व वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
या संदर्भात AIMIM च्या वतीने संबंधित विभागाला लेखी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात ईदगाहकडे जाणारा पारंपरिक मार्ग मोकळा करून देण्याची तसेच रस्त्यावर टाकलेले सिमेंट व साहित्य तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांनी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता मोकळा करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


0 Comments