धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन
ST आरक्षणाची अंमलबजावणी, शिंग्रोबा धनगर लिंक व अहिल्यादेवी होळकर नामकरणासह बाळूमामा देवस्थान कायद्याची मागणी
औसा : धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीचे निवेदन सकल धनगर समाज, औसा तालुक्याच्या वतीने तहसीलदार, औसा यांना देण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयातील ST आरक्षणासंदर्भातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने न्यायालयात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने स्पष्ट व ठाम भूमिका मांडावी, तसेच प्रतिकूल निकालाची परिस्थिती उद्भवल्यास पर्यायी उपाययोजनांचा 'प्लॅन-बी' तयार ठेवावा. केंद्र व राज्य शासनाने समन्वय साधून निश्चित कालमर्यादेत आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. शासनाने तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
यासोबतच मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील संबंधित कनेक्टिंग लिंकला हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, तसेच श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करावा, अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या.
श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांबाबत समोर आलेल्या कथित गैरव्यवहार व अनियमिततेची उच्चस्तरीय SIT चौकशी सुरू असल्यास ती वेळेत पूर्ण करून देवस्थानाचा कारभार अधिक पारदर्शक व भाविककेंद्रित करण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणीही करण्यात आली.
सकल धनगर समाज, औसा तालुक्याच्या वतीने शासनाने या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

0 Comments