औसा शहरातील समस्यांवर एम.आय.एम.चा आक्रोश – प्रशासनाकडे त्वरित पाहणीसाठी मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
औसा प्रतिनिधी
औसा, ९ ऑगस्ट २०२५:
औसा शहरातील नागरिक विविध मूलभूत समस्यांनी त्रस्त असून, रस्ते, नाल्यांची दुर्दशा, घाणीचे साम्राज्य आणि अर्धवट सोडलेली विकासकामे यामुळे शहरात आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर एम.आय.एम. पक्षाने प्रशासनाकडे शहराच्या समस्यांची तातडीने पाहणी करण्याची आणि कार्यवाही करण्याची जोरदार मागणी केली आहे.
एम.आय.एम.चे औसा शहर प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शहरात अनेक ठिकाणी रस्ते अपूर्ण अवस्थेत असून, सांडपाणी नाल्यांमधून वाहण्याऐवजी रस्त्यावर साचत आहे. परिणामी शहरात डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा प्रकोप वाढत आहे.
निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की,
अॅप्रोच रोड ते जलालशाही चौक,निलंगा वेसीमार्गे मार्केट यार्ड,तहसील कार्यालय ते कुरेशी मस्जिद,आणि शहरालगत असलेला जुना रस्ता –या मार्गांची स्थिती अत्यंत बिकट आहे. शहरात एकही रस्ता असा नाही की जो व्यवस्थितपणे वापरण्यायोग्य आहे.
यापूर्वीही अनेकवेळा पत्रांद्वारे निवेदने देऊन समस्या मांडण्यात आल्या आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, नगरपरिषद प्रशासकाच्या ताब्यात आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित वेळ काढून शहरातील परिस्थितीची पाहणी करावी आणि योग्य ती उपाययोजना करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा एम.आय.एम.कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे.
शहरातील जनतेच्या आरोग्याशी निगडीत प्रश्नांची तातडीने दखल घ्यावी आणि रखडलेल्या विकासकामांना चालना द्यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.



0 Comments